>> सुरेश चव्हाण
‘शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे!’ अशा विचारांचा वारसा आपल्या आजोबांकडून घेऊन शिल्पा खेर यांनी 2007 पासून ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण क्षेत्रातील कामास सुरुवात केली. शालेय जीवनापासूनच अभ्यासक्रमासह शिस्तबद्ध, ध्येयनिष्ठ आयुष्य जगण्याची सुरुवात व्हावी, या उद्देशाने शिल्पा खेर व डॉ. जितेंद्र खेर या दाम्पत्याने ‘भाग्यश्री फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली.
‘भाग्यश्री फाउंडेशन’च्या संचालिका शिल्पा खेर व त्यांचे पती डॉ. जितेंद्र खेर यांना गरीब विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी 2007 पासून ‘भाग्यश्री फाउंडेशन’ची स्थापना करून कामाला सुरुवात केली. आज शिक्षणात होणारे बदल पाहता मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांना योग्य दिशा दाखवणे आवश्यक आहे. शिल्पाताई सुरुवातीच्या काळात ‘वात्सल्य फाउंडेशन’च्या आश्रमशाळेत जात असताना त्यांच्या असे लक्षात आले, की केवळ मुलांना पैसे, खाऊ देऊन तात्पुरता आनंद देणे ठीक असले तरी त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जायला सक्षम करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मग त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांतून एक नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली. तो उपक्रम म्हणजे ‘रोजनिशी’ उपक्रम! अगदी पहिल्या इयत्तेपासून मुलांनी दररोज रोजनिशी लिहावी, असा त्यांचा आग्रह आहे.
अनेक विद्यार्थ्यांना धड लिहिता-वाचता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर शिक्षण अधिकाऱयांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षकांकरवी मुलांनी दररोज अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी लिहिले तर त्यांना लिहायची सवय लागेल हा उद्देश आहे. यासाठी त्यांना अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिल्पा खेर यांच्यावर त्यांचे आजोबा विश्राम आबाजी फणसेकर यांचे संस्कार झाले आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यातील फणसे या गावात एकही शाळा नसताना, त्यांनी शाळा सुरू करण्यात पुढाकार घेतला. गरीब-गरजू विद्यार्थ्यांना ते मदत करताना शिल्पाताईंनी लहानपणापासून पाहिले व त्यांच्यावर त्यांचे संस्कार झाले. आपल्याला मिळणाऱया खाऊच्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना त्या थोडीफार मदत करीत असत. ही त्यांची इच्छा लग्नानंतर पूर्ण झाली, ती त्यांचे पती डॉ. जितेंद्र खेर यांच्यामुळे! कारण त्यांनाही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती.
शिल्पाताईंनी बी.एस्सी. नंतर योगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना पोहणे, ब्युटी पार्लरचे शिक्षण, बाहुल्या बनवणे, पाककला असे विविध कोर्स त्या शिकल्या. पुढील आयुष्यात देखील मानसशास्त्र डिप्लोमा, योगशिक्षिकेचा कोर्स, फ्रेंच भाषा, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग असे विविध प्रकारचे शिक्षण त्या घेत राहिल्या. त्यांनी विविध लेखनही केले आहे. त्यामध्ये ‘सत्यमेव जयते, सोल्जर इन मी, यश म्हणजे काय?, ए मेरे वतन के लोगो, सुवर्णकण’ अशा पुस्तकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ‘भोसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक बाळकृष्ण मुंजे यांच्या जीवनावर आधारित मराठी व हिंदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘जस्ट बिलिव्ह’ हे त्यांचे पहिले इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे म्हणून त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम मुंबई-ठाण्यापर्यंत मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शाळांपर्यंत जायला हवा व ती एक चळवळ व्हायला हवी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून कामाला सुरुवात केली. ठाण्यातील पंधरा शाळांपासून सुरुवात केल्यानंतर भिवंडीतील शंभर शाळांपैकी पन्नास शाळा या उर्दू माध्यमाच्या होत्या, हे विशेष! तसेच मुंबईतील चारकोप येथील ज्ञानवर्धिनी शाळा, भांडुपचे केणी विद्यालय या शाळांचाही यात समावेश आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार शाळांमधून त्यांचे काम चालू आहे.
मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, असा कुठलाही उपक्रम शासनामार्फत राबवला जात नाही. केवळ शिक्षकांनी येऊन शिकवायचं व मुलांनी परीक्षेपुरता अभ्यास करायचा, अवांतर वाचन-लेखन मुलांकडून करून घेण्याचे कष्ट शिक्षक घेताना दिसत नाहीत. त्यांना दिशा देण्याचे काम ‘भाग्यश्री फाउंडेशन’ करीत आहे. त्याचबरोबर भावी पिढीचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम संस्थेचे सर्व कार्यकर्ते मनापासून करीत आहेत. त्यामध्ये डॉ. सीमा हर्डीकर, भावना धोत्रे, सोनाली देशमुख यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
‘आत्मनिर्भर युवक उपक्रम’ हा या संस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणता येईल. यासाठी सक्षम नागरिक तयार करणे, नीतीमत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व घडवण्याकरता प्रयत्न करणे, अचूक निर्णयक्षमता, सकारात्मक विचारसरणी व दृष्टिकोन मुलांमध्ये विकसित करणे, मुलांच्या मनात शिस्तीचे महत्त्व रुजवणे, स्वतमधील क्षमतांची योग्य जाणीव जागृत करणे, कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असे जबाबदार नागरिक निर्माण करणे असे या उपक्रमामागील उद्देश आहेत. यासाठी संस्थेला लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्याचबरोबर ‘बेसिक मिलिटरी परिचय’ हा उपक्रम मेजर सुभाष गावंड यांच्या अध्यक्षतेखाली विविध शाळांमध्ये राबविला जातो. विद्यार्थ्यांना त्यातून सैनिकी शिक्षणाविषयी माहिती मिळावी, ज्यांना सैन्यात जायचे असेल त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा यामागचा हेतू आहे. युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठीही शिबिरं घेणे, अपंगत्व येऊनही त्यांनी आपले मनोबल कसे टिकवले आहे, हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून तिथे त्यांना नेले जाते. महिला कैद्यांसाठीही शिबिरं घेतली जातात. आपल्याला जे काही मिळते, त्याची आपण आपल्यापरीने समाजाला परतफेड करणे, हे आपले मूलभूत कर्तव्यच आहे, या जाणिवेतून ‘भाग्यश्री फाऊंडेशन’चे काम सुरू आहे.
– [email protected]