पॅरालिम्पिकसाठी भाग्यश्री जाधवला ध्वजवाहकाचा मान

ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार संपल्यानंतर आता पॅरिसमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धा रंगतेय आणि या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघाचे ध्वजवाहक म्हणून महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधव यांच्यासह भालाफेकपटू सुमित अंतिल यांना मान लाभला आहे. पॅरिसमध्ये 12 दिवस रंगणाऱ्या क्रीडा सोहळ्यासाठी हिंदुस्थानचे 84 खेळाडू सहभागी होणार असून यात 23 महिला खेळाडूंचा समावेश आहे, तर 52 पुरुष खेळाडू भाग घेणार आहेत.

1985 मध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिह्यातील मुखेड तालुक्यातील होनवादाज येथे भाग्यश्री यांचा जन्म झाला. 2006 मध्ये झालेल्या एका अपघातामुळे त्यांना व्हिलचेअरवर बसावे लागले, मात्र खचून न जाता त्यांनी गोळाफेक खेळ निवडला. 2022च्या आशियाई पॅरा स्पर्धेत भाग्यश्री यांनी रौप्यपदकावर आपले नाव कोरले. फेजा वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक, जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन कांस्यपदके आणि 2017 च्या पुणे महापौर स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावली आहेत.

पॅरालिम्पिक स्पर्धेतील हिंदुस्थानी खेळाडूंची यादी :

तिरंदाजी : हरविंदर सिंग, राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी, पूजा, सरिता, शीतल देवी.

पॅरा अ‍ॅथलिट्स : दीप्ती जिवांजी (400 मी), सुमित अंतिल, संदीप, अजित सिंग, सुंदर सिंग गुर्जर, रिंकू, नवदीप, प्रवीण कुमार, दीपेश कुमार, संदीप संजय गुर्जर, भवानीबेन चौधरी (सर्व भालाफेक), योगेश कथूनिया, करमज्योती, कांचन लखानी (थाळीफेक), धरमबीर, प्रणव सूर्मा व अमित कुमार (क्लब थ्रो), निशाद कुमार व राम पाल, मरियप्पन थांगावेलू, शरद कुमार व शैलेश कुमार (उंच उडी), भाग्यश्री जाधव, सचिन खिलारी, मोहम्मद यासेर व रोहित कुमार, मनू, रवी रोंगाली, अरविंद, सोमन राणा, होकाटो सेमा, अमिषा रावत (सर्व गोळाफेक), प्रवीण कुमार (उंच उडी), दिलीप गावीत (400 मी), साक्षी कसन, रक्षिता राजू (1500 मी.), प्रिथी पाल, सिमरन (100 मी. व 200 मी).

बॅडमिंटन : मनोज सरकार, नितेश कुमार, पृष्णा नगरं, शिवराजन सोलैमालाई, सुहास याथिराज, सुकांत कदम, तरुण, मानसी जोशी, मनदीप कौर, पलक कोहली, मनीषा रामदास, थुलासिमाथी मुरुगेसन, नित्या शिवन.

नेमबाजी : आमीर भट, अवनी लेखरा, मोहन अगरवाल, निहाल सिंग, मनीष नरवाल, रुद्राक्ष खांडेलवाल, सिद्धार्थ बाबू, श्रीहर्षा रामपृष्णा, स्वरूप उन्हांळकर, रुबिना फ्रान्सिस.

जलतरण : सुयश जाधव.

टेबल टेनिस : सोनलबेन पटेल, भाविनाबेन पटेल.