
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबा संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबने सती प्रथा बंद केली होती, असे भालचंद्र नेमाडे म्हणाले. तसेच औरंगजेबच्या दोन राण्या काशीविश्वेश्वरला गेल्या होत्या. त्यावेळी तिथं असलेल्या पंडितांनी राण्यांना भ्रष्ट केलं. त्यानंतर तिथं जी मोडतोड औरंगजेबाने केली त्याला ज्ञानवापी म्हणून आता ओळखलं जातं, असा दावा नेमाडे यांनी केला.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची सांगता शनिवारी झाली. त्यावेळी नेमाडे बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख अतिथी म्हणून भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी उपस्थित होते.
यावेळी पुस्तकांचे महत्त्व सांगताना नेमाडे म्हणाले, आपल्याला इतिहासासंदर्भात माहिती हवी असेल तर पुस्तके वाचणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजीरावाबाबत चुकीची माहिती सांगितली जाते. दुसरा बाजीराव चांगला होता. त्यांनी पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्राला वाचवले. इंग्रज वाईट होतेच पण पेशवेही काही चांगले नव्हते.
नेमाडे पुढे म्हणाले, औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले. औरंगजेबाने सती प्रथा बंद केली. औरंगजेब हा सती प्रथा बंद करणारा पहिला राजा होता. सध्या दररोज बातम्या येत आहेत. तीनशे- साडेतीनशे लहान मुली पळवून नेल्या जातात. हे सहन होत नाही. येथे राहायचे कशाला, असा सवाल नेमाडे यांनी उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुख्य सेनापती मुसलमान होता. तर औरंगजेबाचा मुख्य सेनापती हा हिंदू होता, असेही नेमाडे म्हणाले.






























































