
मराठीत शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत असून, इंग्रजीतील शिक्षणाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. मुंबईत दरवर्षी दोन-तीन मराठी शाळा बंद पडतात, याबाबत आपले लोक आणि सरकारही काही करीत नाही, असं सगळं वाईट सुरू आहे. मराठी भाषाच नाहीशी होत गेली तर उद्या मराठीला अल्पसंख्याक भाषेचा दर्जा द्या, आरक्षण द्या, अशी मागणी करण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती सध्या मराठीची आहे, असा संताप ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे विश्व मराठी संमेलनात शुक्रवारी त्यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर परखड मत व्यक्त केले. मराठी भाषा ही मराठी लोकच कमी करत आहेत. मराठी शाळेतील मुलं सूटबूट घालत नाहीत म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकले जात आहे. इंग्रजीमुळे नोकऱ्या मिळतात हे मला पटत नाही. मातृभाषेतून आपल्या संकल्पना नीट होतात, असे भाषा शास्त्रज्ञ सांगतात. परक्या भाषेतील ज्ञान टिकत नाही.
विश्व मराठी संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन
सर्वच देश आपापल्या भाषेला प्राधान्य देतात. भारतीय लोकांना मात्र इंग्रजी भरपूर येतं, ते केवळ अमेरिका, इंग्लंडमध्ये जाण्यासाठी इंग्रजी शिकताय हे दुर्दैव आहे. आपण मराठी भाषेचे वैभव वाढवले पाहिजे. इंग्रजी शिकणाऱ्यांना नव्हे तर कानडी, तमिळ, बंगाली भाषिकांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार मिळाले आहेत, असे ते म्हणाले. आईने शिकवलेली मातृभाषा वंदनीय आहे, जशी आई वंदनीय तशीच भाषाही वंदनीय हे मान्यच केलं पाहिजे. कुठेही जाईन तरी मराठीतच विचार करीन, असा निर्धार केला पाहिजे. आपल्याकडे प्राथमिक शिक्षण नेमपं दुसऱ्या भाषेतून घेतले जात असल्याने तरुणांची डोकी आऊट होतायेत, लुळी माणसं तयार होतायेत, आपली प्रगती होत नाही. सध्या सगळं खोटं चाललंय, आपण जगातली सगळ्यात मोठी सत्ता आहोत, हे भासवलं जात असलं तरी या देशात लोकांना खायला मिळत नाही. आपण मराठीचं सत्त्व टिकवलं पाहिजे, ती वाढवली पाहिजे, परकीय भाषा बंद केली पाहिजे, खरे तर याबाबत कायदाच व्हायला हवा. संयुक्त राष्ट्र संघाने सांगितल्याप्रमाणे देशभर चौथीपर्यंत तरी मातृभाषेतच शिक्षण व्हायला हवं. मराठी भाषाच कमी होत गेली तर उद्या मराठीला अल्पसंख्याकाचा दर्जा द्या, अशी परिस्थिती निर्माण होईल. आम्ही मराठी आहोत, मराठीसाठी आरक्षण ठेवा, अशी मागणी करण्याची वेळ येईल. तुम्ही गुलाम आणि आरक्षण मागणारे व्हाल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सध्या सगळं खोटं चाललंय, आपण जगातली सगळ्यात मोठी सत्ता आहोत, हे भासवलं जात असलं तरी या देशात लोकांना खायला मिळत नाही.

























































