भंडारा रुग्णालय आग प्रकरण- जिल्हा शल्यचिकित्सकासह पाचजण निलंबित

भंडारा जिल्हा रुग्णालयात भीषण आग प्रकरणी आरोग्य मंत्रालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांसह पाच जणांना निलंबित केले असून एका महिला वैद्यकीय अधिकाऱयाची बदली करण्यात आली आहे.

9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचायांच्या सतर्पतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं.

या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचायांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आले .

या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या