भंडारा जिल्ह्यामध्ये सदनिका विक्रीच्या माध्यमातून गैररव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भंडाऱ्यातील माजी नगरसेवकाला तुरुंगवास झाला आहे. ग्राहक मंचाने हा निर्णय दिला असून तक्रारदाराला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. नितीन धकाते (वय – 36, रा. शास्त्रीनगर, भंडारा) असे आरोपी नगरसेवकाचे नाव आहे.
नितीन धकाते यांनी खोकरला भागात साई वात्सल्य अपार्टमेंट तयार केले. एका अपार्टमेंटमध्ये 9 सदनिका तयार करण्याची परवानगी असतानाही 12 सदनिका तयार केल्या. या सदनिका 14 जणांना विकण्याचा प्रताप माजी नगरसेवकाने केला. एकच फ्लॅट दोन जणांना विकल्याचे समोर आले. सदनिका विकत घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे पर देण्याची मागणी केली. मात्र टाळाटाळ होऊ लागल्याने त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.
काही वैयक्तीक तर काही सामूहिक असे जवळपास 4 प्रकरणं जिल्हा ग्राहक मंचात दाखल झाले. यात सुमित कपूर यांच्या प्रकरणामध्ये माजी नगरसेवक नितीन यांना 3 वर्षांची शिक्षा झाली. तर अन्य 14 जणांच्या सामूहिक प्रकरणात ग्राहक मंचाने दोषी नगरसेवकाला 18 टक्के व्याजासह 2 कोटी रुपये रक्कम परत करण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने माजी नगरसेवकाविरुद्ध अटक वॉरंट काढले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली असल्याची माहिती वकील संतोष सिंह सुखदेव सिंह चौहान यांनी दिली.