
मुळा धरणात मंगळवारी कोतूळकडून उच्चांकी आवक झाल्याने दुपारी 12 वाजता धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. यातून 1075 क्युसेकने मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा पाणीसाठा 24 हजार 444 दशलक्ष घनफूट (94 टक्के) झाल्याने धरण तांत्रिकदृष्टय़ा भरल्याचे जाहीर करण्यात आले. तर, कोतूळकडून आठ हजार 376 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 14 दिवस उशिराने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दरम्यान, सलग चौथ्या वर्षीही मुळा धरण भरल्याने नऊ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह शेतीपाणी आवर्तनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मंगळवारी सकाळी सहा वाजता कोतूळकडून मुळा धरणात 28 हजार 397 क्युसेकने पाण्याची उच्चांकी आवक सुरू होती. नऊ वाजता 18 हजार 230 क्युसेक, तर दुपारी 12 वाजता 12 हजार 871 क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहिली. दुपारी 12 वाजता धरणाचा पाणीसाठा 23 हजार 946 दशलक्ष घनफूट झाल्याने माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते जलोत्सारणीच्या पंपाची कळ दाबून धरणातून मुळा नदीपात्रात 1075 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. कोतूळकडून पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुळा नदीपात्रात पाणी सोडताना मुळा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी. बी. अकोलकर, शाखाधिकारी आंधळे, पाटबंधारे कर्मचारी आर. के. पवार, दत्तात्रय पवार उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 24 हजार 444 दशलक्ष घनफूट, तर पाणीपातळी 1809.30 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली होती. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाचा पाणीसाठा 25 हजार 444, तर पाणीपातळीची नोंद 1811.05 फूट झाली होती.
लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण
रोहिणी, मृग, आर्द्रा, आश्लेषा, मघा या खात्रीच्या नक्षत्रांत घाटमाथ्यावर पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा मुळा धरण वेळेवर भरणार का? ही चिंता निर्माण झाली होती. मात्र, पुनर्वसु व पुष्य नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व 13 सप्टेंबरपासुन सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्रातील पावसाचा मुळा धरण तांत्रिकदृष्टय़ा भरण्यास हातभार लागला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



























































