
मुळा व भंडारदारा धरणांच्या पाणलोटक्षेत्रात 15 दिवसांची विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे उत्तर नगर जिह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता 10 हजार 91 दशलक्ष घनफुटांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण आज 91.41 टक्के भरले आहे, तर निळवंडे धरणानेही 80 टक्क्यांची पातळी गाठली आहे.
15 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रवरेच्या उपनद्यांबरोबरच ओढे-नाले वाहते झाल्याने भंडारदरा धरणात पाण्याची नव्याने आवक वाढली आहे. 12 तासांत भंडारदरा धरणात नव्याने 158 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. रतनवाडी 156, घाटघर 80, पांजरे 69, भंडारदरा 65, तर वाकी येथे 41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
निळवंडे धरण गुरुवारी सकाळी सहा हजार 538 (78.58) टक्के झाले होते. त्यात वाढ होऊन सायंकाळी पाणीसाठा सहा हजार 566 (79 टक्के) झाला होता, तर शुक्रवारी सायंकाळी सहा हजार 661 दलघफू पाणीसाठा झाल्याने धरण 80.06 टक्के भरले आहे. वाकी तलावातून 54 क्युसेक, तसेच अन्य पाणी निळवंडेत दाखल होत आहे.
मुळा धरण 82 टक्क्यांवर
मुळा पाणलोटात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहीसा वाढला होता. त्यामुळे मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग दोन हजार 617 क्युसेकवर पोहोचला होता. गेल्या महिनाभरानंतर कोतूळकडून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने धरणात 24 तासांत 79 दलघफू पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा 21 हजार 349 दलघफूट म्हणजे 82.11 टक्के झाला होता. धरणाची पाणीपातळी 1802.69 फूट होती. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 25 हजार 444 दलघफू पाणीसाठा होता, तर पाणीपातळी 1811.05 फूट होती.

























































