
देशभरात 10 मोठय़ा ट्रेड युनियन्स आणि शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. या आंदोलनाला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. बँका बंद होत्या. परिवहन सेवेवर अनेक ठिकाणी परिणाम झाला. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे पोलीस आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे बंदर रेल्वे स्थानकात माकपा कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. दिल्लीत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय केंद्रीय ट्रेड युनियन परिषदेच्या सदस्यांनी जंतर-मंतर येथे निदर्शने केली. मुंबईसह दिल्ली, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर, मध्य आणि पश्चिम हिंदुस्थानात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.