
आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा रस्सीखेच सुरू आहे. याच दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. परंतु सोमवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये इतर बड्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला, मात्र भालके हे ‘वेटिंग’वर होते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी घड्याळ बांधले.
गेल्या काही दिवसांपासून भालके हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र सोमवारी त्यांनी अचानक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंढरपूरमधून त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

























































