
गुहागर विधानसभा मतदार संघातून शिवसेना-भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार भास्कर जाधव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज गुहागरमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांनी शृंगारतळी येथे विक्रमी रॅली काढली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
भाजपा-शिवसेना-रिपाई व इतर मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज गुहागरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सूपूर्द केला. तत्पूर्वी शृंगारतळी जानवळे फाट्यावरील शिवसेना कार्यालयापासून पालपेणे रोडवरच्या भवानी सभागृहापर्यंत भास्कर जाधव यांची ओपन जिपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीचे चित्र शृंगारतळी बाजार पेठेतील सर्वांसाठी अचंबीत करणारे होते. हजारो महिला पुरूष कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन, डोकीवर भगवी टोपी व गळ्यात पट्टा घातल्याने संपूर्ण बाजारपेठ भगवामय झाली होती. यावेळी जि.प. पं.स.सदस्य, सभापती-उपसभापती, माजी तालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख सचिन बाईत, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा खेतले व गुहागर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपत शिगवण, चिपळूण पं.स.उपसभापती शरद शिगवण, अरविंद चव्हाण, जि.प.सदस्य उपस्थित होते.































































