अर्थसंकल्पीय अधिवेशनातल भाषण मुख्यमंत्र्यांनी नागपूरात कॉपीपेस्ट केलं, भास्कर जाधव यांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा केली. त्या भाषणावरून शिवसेनेचे विधीमंडळातील नेते, आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांचे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशनातल भाषण कॉपी पेस्ट केलं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली. ”हे अधिवेशन तीन आठवडे चालावं अशी आमची मागणी होती. पण सरकारने सात दिवस हे अधिवेशन चालवलं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाला बोलवलं जातं तेव्हा आम्ही आमची भूमिका मांडली होती. हे अधिवेशन कुणालाच फायदा झाला नाही. ना विदर्भातील जनतेला त्याचा फायदा झाला ना उर्वरित महाराष्ट्रातील जनतेला. निवडणूकांना सरकारी तिजोरीतील पैसे वाटता आले पाहिजे. सरकारी तिजोरीतून पैसे वापरता आले पाहिजे. त्यासाठी पुरवण्या मागण्या मान्य केल्याशिवाय ते पैसे उधळता येणार नाही. त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी नाही तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी हे अधिवेशन होतं. त्याप्रमाणे सरकारने 75286 कोटींच्या मागण्या मांडल्या व दोनच दिवसात मान्य करून घेतल्या. त्या मान्य झाल्यावर सरकारी पक्षाचा या अधिवेशनाकडे सहभाग घेण्याचा मूडच बदलून गेला. मंत्री सभागृहात बसत नव्हते. ज्या विभागाची चर्चा होती. तो मंत्रीही सभागृहात नव्हता”, असे भास्कर जाधव म्हणाले.

”सभागृहाच्या अध्यक्षांनी अधिवेशनाचा तपशील दिला. त्यात त्यांनी सांगितलं की हे अधिवेशन सात दिवसांचं झालं. त्यात 72 तास कामकाज चाललं. सरासरी रोज 10 तास कामकाज चाललं. यापैकी सभागृहाचा वेळ किती मिनिटं वाया गेला तर फक्त आणि फक्त दहा मिनिटं. फक्त दहा मिनिटं वेळ वाया गेला याचा अर्थ आम्ही विरोधी पक्षाने किती सहकार्य केलं, महाराष्ट्राला जनतेला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही संयम पाळला. हे त्यांनीच दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतं”, असे भास्कर जाधव म्हणाले.

”विदर्भाच्या जनतेच्या हातात काहीही पडणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं. सरकारने जे निर्णय घोषित केले आहेत ते सगळे महानगरपालिकेशी संबंधित आहेत. यात सगळ्यात जास्त मुंबई महानगरपालिकेचेच आहे. सरकार विदर्भातील जनतेला कोणताही न्याय देणार नाही हे आम्हाला माहित होतं त्यामुळे आम्ही चहापानाला गेलो नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी आज जे भाषण केलं ते याआधीही केलेले आहे. याआधीचं मुंबईला जे अर्थसंकल्पीय भाषण केलं तेच नागपूर अधिवेशनात कॉपी पेस्ट केलं आहे. आजच्या भाषणात काय फरक आहे ते आम्हाला सांगा”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.