
लोकसभा निवडणुकीत मिंध्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका मीरा-भाईंदरमधील भाजपने घेतल्यानंतर आज कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. मेळाव्यात मीरा-भाईंदरचे भाजप विधानसभा प्रमुख रवी व्यास यांना सन्मान न दिल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गोंधळ घातला. याच वेळी माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थकही भिडले आणि दोन्ही गटांमध्ये शिमग्याआधीच बोंबाबोंब झाली. व्यास व मेहता समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला असून हीच का मोदी गॅरंटी, असा संतप्त सवाल केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मीरा रोड येथील जुना गोल्डन नेस्ट या भागात असलेल्या ब्ल्यू मून क्लब येथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी भाजपचे मीरा-भाईंदर प्रभारी जे.पी. ठाकूर उपस्थित राहणार होते. कार्यक्रमाच्या वेळी मीरा-भाईंदर विधानसभा प्रमुख अॅड. रवी व्यास यांना सन्मान न देता डावलल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले.
काही वेळाने हे संतप्त कार्यकर्ते थेट मंचावर चढले. हे पाहून नरेंद्र मेहता समर्थकदेखील आक्रमक झाले. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरू झालेल्या हा वाद काही क्षणातच मोठय़ा प्रमाणात हाणामारीत रूपांतरित झाला. भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी किशोर शर्मा यांनादेखील मारहाण केली.
विधानसभेच्या तिकिटासाठी आतापासूनच रस्सीखेच
आज झालेला भाजपचा मेळावा हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असला तरी प्रत्यक्षात पुढील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता व विधानसभा प्रमुख रवी व्यास यांच्यात आतापासूनच तिकिटासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच आज हाणामारी झाली असल्याचे बोलले जाते.



























































