भिवंडीचे उपमहापौर तारिक बारी मोमिन यांच्या सदस्यपदावर टांगती तलवार आहे. तारिक मोमिन यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्रावर माजी नगरसेवक इस्माईल रंगरेज यांनी आक्षेप घेत कोकण विभागीय जातपडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. यावर दोन वेळा सुनावणी झाली असून त्यांनी पुरावा सादर न केल्यास उपमहापौर तारिक मोमिन यांचे पद रद्द होणार आहे.
काँग्रेसचे तारिक बारी मोमिन प्रभाग क्रमांक 9 अ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मोमिन इतर मागासवर्गीय प्रवर्गातून विजयी झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना ओबीसीचा दाखला जोडला आहे, परंतु तारिक बारी मोमिन यांचे नातेवाईक उत्तर प्रदेश प्रतापगड येथील मूळ रहिवासी आहेत. दरम्यान, कोणत्याही शासकीय दस्तावेजमध्ये कोणाचेही आडनाव मोमिन असे नमूद नाही, त्यामुळे तारिक मोमिन यांनी भिवंडी तहसीलदार कार्यालयातून मिळवलेला मोमिन जातीचा ओबीसी दाखला हा बोगस असल्याचा दावा रंगरेज इस्माईल यांनी केला आहे.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेश येथील मतदार ओळखपत्र, शिधावाटप पत्रिका व जमीन महसूल दप्तरी त्यांचे कोणाचेही आडनाव मोमिन म्हणून नमूद नसल्याचे 25 पुरावे इस्माईल रंगरेज यांनी तक्रार अर्जासोबत जोडले आहेत. दरम्यान, तारिक मोमिन यांचा ओबीसी जातीचा दाखला बनावट असल्याची शंका उपस्थित होत आहे असा आरोप इस्माईल रंगरेज यांनी केला आहे.

























































