भिवंडीतील राहनाळ येथील गोदामाला भीषण आग; एकाच दिवसात आगीच्या दोन घटना

एकीकडे देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. सगळे व्यापार उद्योग बंद असतांनाही ज्वालामुखीचा तालुका म्हणून नवी ओळख निर्माण झालेल्या भिवंडीत एकाच दिवसात आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. रात्री दिड वाजेच्या सुमारास एका भंगार गोदामाला आग लागली होती. तर सायंकाळी धागा बनविण्यासाठी लागणाऱ्या कोमचा साठा केलेल्या गोदामाला गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

भिवंडी तालुक्यातील राहनाल गावातील कांचन कंपाऊंड मधील एका कोमच्या गोदमला ही भीषण आग लागली असून आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. मात्र आग लागल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचा शर्थीचे प्रयत्न सुरु असून गुरुवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास देखील एका भंगार गोदामाला आग लागल्याने एकाच दिवसांत आगीची दुसरी घटना घडली आहे. दापोडे परिसरात भांगरच्या गोदमला ही भीषण आग लागली होती. या भंगार गोदामात लाकूड ,प्लास्टिक वस्तू , कागदी पुठ्ठा मोठ्या प्रमाणात साठा होता. या आगीचे कारण देखील अद्याप अस्पष्ट असले तरी रात्री लागलेल्या या आगीमुळे दापोडा परिसरातील बत्ती गुल करण्यात आली होती. तसेच आगीपासून निघणाऱ्या धुरामुळे गावातील नागरिकांना डोळ्यात चुळचुळणे, श्वसनासाठी त्रास सहन करावा लागला . भिवंडी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने रात्री उशिराने हि आग विजवण्यात आली. दरम्यान देशभर संचारबंदी असूनही भिवंडीत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यामुळे या आगी नेमकी लागतात की लावल्या जातात अशी शंका निर्माण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या