भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी, रुग्णवाहिका रस्त्यातच ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने एका युवकाचा बळी घेतला आहे. यश मोरे (18) असे त्याचे नाव असून मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यातच आडवी उभी करून संतप्त ग्रामस्थांनी आज आंदोलन केले. या रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान खड्ड्यांना जबाबदार असलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

मडक्याचा पाडा येथे राहणारा यश मोरे हा आपला मित्र यश घुटे याच्यासोबत कवाड येथे व्यायाम करण्यासाठी 20 जुलै रोजी बाईकने जात होता. एका खड्ड्यामध्ये बाईक आदळली आणि दोघेही त्यात पडून गंभीर जखमी झाले. त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दहा दिवसांच्या उपचारानंतर यशचा आज मृत्यू झाला. ही घटना गावात कळताच संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली.

गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही

माझ्या मुलाच्या मृत्यूला ठेकेदार व अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा त्याचे वडील राजेश मोरे यांनी दिला. तसेच ग्रामस्थही आक्रमक झाले. अखेर पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे यांनी ग्रामस्थांची समजूत काढली व गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.