खेळण्याच्या नादात मुलगा रस्ता भरकटला, भोईवाडा पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिला

शिवडी म्हाडा काॅलनीत राहणारा पाच वर्षांचा मुलगा खेळण्याच्या नादात रस्ता भरकटला. आणि भोईवाडा नाक्याजवळ येऊन पोहचला. वाहनांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी आल्याने मुलगा घाबरला. करायचे काय हेच त्याला सुचेनासे झाले. अखेर तो भोईवाडा पोलिसांच्या हाती लागला आणि सुखरूप पालकांच्या ताब्यात पोहचला.

भोईवाडा पोलिसांना एकाने काॅल केला आणि एक लहान मुलगा ग.द. आंबेकर मार्गावरील मनपसंत बेकरी येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार सहाय्यक फौजदार गावकर व त्यांचे पथक त्याठिकाणी पोहचले. त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन आजूबाजुचा परिसर पिंजून काढला. पण मुलांचे घर सापडले नाही. तो शिवडी येथील म्हाडा काॅलनीत राहत असल्याचे कळताच तेथेही पोलिस गेले. पण त्याच्याही काही फायदा झाला नाही. परिणामी मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सुदैवाने मुलांचे पालक तेथे मुलाचा शोध घेत पोहचले. आईने तिच्या मुलाला पाहिल्यानंतर आवश्यक बाबींची पुर्तता करून पोलिसांनी मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.