भोजपुरी चित्रपटसृष्टीचे ‘भीष्म पितामह’ काळाच्या पडद्याआड, वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोजपूरीतील प्रसिद्ध अभिनेते बृजेश त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मीडिया वृत्तानुसार, बृजेश यांना दोन आठवड्यांपूर्वी डेंग्यु झाला होता. त्यांच्यावर मेरठच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर ते मुंबईला आले होते. त्यानंतर त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. ते त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होते आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बृजेश त्रिपाठी यांनी 44 वर्षे सिनेइंडस्ट्रीत काम करत होते. त्यांनी 1979 भोजपूरी सिनेमा ‘सईया तोहरे कारण’ या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. हिंदीत ‘टॅक्सी चोर’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. जो 1980 ला प्रदर्शित झाला होता. भोजपुरीमध्ये येण्यापूर्वी ते बॉलीवूडमध्ये काम करत होते. त्यांनी अनेक टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी  अमिताभ बच्चन, अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती, रवी किशन, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना सारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 250 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. भोजपूरी सिनेमांमधील त्यांच्या योगदानामुळे त्यांना इंडस्ट्रीतील भीष्म पितामह बोलायचे.