मित्राच्या वाढदिवसासाठी निघालेल्या ६ जणांना जलसमाधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फिरायला गेलेल्या सहा तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सहाजण रविवारी दुपारी भोपाळहून निघाले होते. त्यांची गाडी कोलार स्टॉप धरणाजवळ आली असता ४० फूटांच्या उंचीवरून कोसळली. लोकांनी सकाळी धरणाच्या फिल्टर प्रकल्पात अडकलेली कार पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. त्यात सहा तरुणांचे मृतदेह आढळले.

आकाश साहू, पंकज साहू, रंजीत साहू, अभिजीत राठोड, गौरव साहू आणि रजनीश पटेल यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हे सर्व आकाशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. गाडी वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार धरणात पडल्याची शक्यता सीहोरचे पोलीस उपअधीक्षक समीर यादव यांनी व्यक्त केली. या तरुणांनी मद्यपान केले होते का, याबाबत तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत तरूण घरी परतले नसल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. मृतांचा कुटुंबीयांना अपघाताबाबतची माहिती देण्यात आली आहे.