
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगावास भोगत आहे. त्याला रायपूर केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले आहे. या कारागृहातील एक बॅरेक सध्या चर्चेत आला आहे. कारण चैतन्य बघेल याला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे, त्याच बॅरेकमध्ये त्याचे वडील भूपेश बघेल आणि दिवंगत आजोबा नंदकुमार बघेल यांनाही ठेवण्यात आले होते. कैदखान्यातील दुर्मिळ योगायोगाची सध्या छत्तीसगडच्या राजकारणात खरपूस चर्चा सुरू आहे.
नंदकुमार बघेल
भूपेश बघेल यांची वडील नंदकुमार बघेल यांना 2021 मध्ये ब्राह्मण समाजाविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अटक करण्यात आली होती. त्यांनी लिहिलेल्या ‘ब्राह्मण कुमार रावण को मत मारो’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांना आग्रामध्ये अटक करून रायपूरच्या केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचेच सरकार होते. नंदकुमार बघेल यांना त्यावेळी ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते त्याच बॅरेकमध्ये त्यांचा नातू चैतन्य यालाही ठेवण्यात आले आहे.
भूपेश बघेल
भूपेश बघेल यांना 2017 मध्ये कथित सेक्स सीडी प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी ते छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आधी बघेल यांचे निकटवर्तीय विनोद वर्मा यांना अटक झाली आणि त्यानंतर भाजप सरकारने बघेल यांनाही बेड्या ठोकल्या. बघेल यांनी त्यावेळी जामीन नाकारत कारागृहात सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात ते नंतर निर्दोष सुटले, मात्र त्यावेळी त्यांना रायपूर केंद्रीय कारागृहातील त्याच बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे आज चैतन्य बघेल याला ठेवण्यात आले आहे.
चैतन्य बघेल
मद्य घोटाळ्या प्रकरणी चैतन्य बघेल याला अटक करण्यात आली असून 18 जुलै 2025 पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. वडील आणि आजोबांना ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते, तिथेच चैतन्यला ठेवण्यात आले आहे. महिन्याभरात चैतन्यने कारागृहात जवाहरलाल नेहरू यांचे ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र ‘सत्याशी माझे प्रयोग’ वाचले आहे.
काय आहे प्रकरण?
चैतन्य बघेल याला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली. 2019 ते 2022 काळातील हा मद्य घोटाळा असून जेव्हा छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेत होते. या घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीला 2,100 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले, तर दारूच्या सिंडिकेटला अवैध नफा मिळाला, असा आरोप आहे. याप्रकरणी आतापर्यंत 205 कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे.