
टेनिस जगतातील ‘सुपरमॉम’ असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे 24 व्या ग्रॅण्डस्लॅम पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न अखेर भंगले. कॅनडाची बियांका आंद्रेस्कू अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची नवी राणी ठरली. नव्या दमाच्या या खेळाडूने किताबी लढतीत आपल्याहून दुप्पट वयाच्या सेरेनाला 6-3, 7-5 असे सरळ सेटमध्ये हरवून जेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह बियांका आंद्रेस्कूने कारकीर्दीतील पहिलेवहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. 19 वर्षीय बियांका ही मारिया शारापोवानंतरची सर्वांत तरुण आणि कॅनडाची पहिली ग्रॅण्डस्लॅम विजेती ठरली. मोठय़ा स्पर्धांमधील सेरेनाचा हा अंतिम लढतीतील सलग चौथा पराभव होय, तर अमेरिकन ओपनमध्ये तिला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
…तेव्हा बियांकाचा जन्मही झाला नव्हता
सेरेना विल्यम्सने 1999 मध्ये पहिल्यांदा अमेरिका ओपनचा किताब जिंकला होता तेव्हा बियांका आंद्रेस्कूचा जन्मही झाला नव्हता. 16 जून 2000 रोजी जन्मलेली बियांका कळायला लागल्यापासून सेरेनाचा टेनिस कोर्टवरील झंझावात बघूनच मोठी झाली. याच 38 वर्षीय सेरेनाविरुद्ध खेळण्याचे स्वप्न 19 वर्षीय बियांकाने पाहिले होते. अमेरिका ओपनच्या किताबी लढतीत तिचे हे स्वप्न केवळ सत्यात उतरले नाही, तर तिने चक्क जेतेपदाला गवसणी घालून इतिहास घडविला.
बियांकाचा सेरेनाला धक्का
आठव्या मानांकित सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियाच्या मारग्रेट कोर्टच्या 24 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याची संधी होती. त्यामुळे अमेरिकन टेनिसप्रेमींनी सेरेनाचा विक्रम बघायला कोर्टवर गर्दी केली होती. मात्र गमावण्यासारखे काहीच नसलेल्या 15 व्या मानांकित बियांकाने पहिल्या मिनिटापासून सेरेनाला निकाराची झुंज देत पराभूत केले.



























































