
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) फ्यूचर समूहासोबतचा 24 हजार 713 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द केला आहे. या व्यवहाराला सुरक्षित कर्जदारांच्या बैठकीत मंजुरी न मिळाल्याने हा व्यवहार रद्द केल्याचे ‘आरआयएल’ने स्पष्ट केले. त्यामुळे आता फ्यूचर समूहाच्या बिग बाजारमधून रिलायन्स बाहेर पडले आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या मते फ्यूचर ग्रुपने फ्यूचर रिटेल आणि अन्य कंपन्यांनी शेअरधारक आणि कर्जदारांसमोर या व्यवहारावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र हा प्रस्तावच रद्द करण्यात आला. शुक्रवारी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या सुरक्षित कर्जदारांनी या व्यवहाराच्या विरोधात आपले मत दिले होते. त्यानंतर शनिवारी रिलायन्स या व्यवहारातून एका पाऊल मागे गेले आहे. फ्यूचर ग्रुपला कर्ज देणाऱया कर्जदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर रिटेलमधील 24 हजार 730 कोटींच्या व्यवहार रद्द केला होता.
फ्यूचर ग्रुपने ऑगस्ट 2020 मध्ये रिलायन्स ग्रुपची कंपनी रिलायन्स रिटेल वेन्चर्स लिमिटेडसोबत या व्यवहाराची घोषणा केली होती. या व्यवहारांतर्गत किरकोळ आणि मोठय़ा प्रमाणावर विविध लॉजिस्टिक व्यवसाय करणाऱया फ्यूचर ग्रुपच्या 19 कंपन्या रिलायन्स रिटेल अधिग्रहण करणार होती.


























































