महागाईचे सीमोल्लंघन सोने @1,18,640

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या पार आवाक्याबाहेर गेले आहेत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ होऊन तो प्रतितोळा 1,18,640 रुपये झाला, तर चांदीही 1,51,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली. मागील 12 दिवसांत सोन्याच्या दरात 7500 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी 1200 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता प्रतितोळा सोन्याचे दर विनाजीएसटी 1,18,640 रुपये झाले आहेत. हेच दर जीएसटीसह 1,22,199 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत, तर आज 22 कॅरेट सोन्याचे दर 1,100 रुपयांनी वाढले आहेत. हे दर विनाजीएसटी 1,08,750 रुपये झाले आहेत. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर 88,980 रुपये झाले आहेत.