हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार! संरक्षण मंत्रालयाकडून रशियाच्या S-400 क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा आणि हवाई संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीला हिरवा कंदील दाखवला आहे. संरक्षण संपादन परिषदेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता हिंदुस्थानी हवाई दलाची (IAF) ताकद अनेक पटींनी वाढणार आहे.

S-400 ही जगातील सर्वात आधुनिक आणि घातक हवाई संरक्षण प्रणाली मानली जाते. या प्रणालीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची अफाट मारक क्षमता. ही यंत्रणा ४० किलोमीटरपासून ते ४०० किलोमीटरपर्यंतच्या विस्तीर्ण टप्प्यात शत्रूची विमाने, स्टेल्थ फायटर जेट्स, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा अचूक वेध घेऊ शकते. विशेष म्हणजे ही प्रणाली एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असून, शत्रूचे क्षेपणास्त्र हिंदुस्थानी हद्दीत शिरण्यापूर्वीच ते हवेत नष्ट करण्याची ताकद यात आहे.

सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही हवाई घुसखोरीला रोखण्यासाठी S-400 एक संरक्षक कवच म्हणून काम करेल. रशियासोबतच्या या संरक्षण करारामुळे हिंदुस्थानी लष्कराचे आधुनिकीकरण तर होईलच, शिवाय आशिया खंडातील लष्करी शक्तीचे संतुलन राखण्यासही मोठी मदत होणार आहे.