
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग युजर्ससाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. विशेषतः कार, जीप आणि व्हॅन मालकांसाठी ‘नो युवर व्हेइकल’ (KYV) प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे टोल प्लाझावर होणारी अनावश्यक त्रास आणि दस्तऐवज दाखवण्याच्या त्रासापासून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
आतापर्यंत फास्टॅग सक्रिय झाल्यानंतर KYV प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होती. यात वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि इतर दस्तऐवजांची पडताळणी करावी लागत होती. वैध दस्तऐवज असूनही फास्टॅग ब्लॉक होणे किंवा बँकांकडून वारंवार फॉलो-अप करावे लागणे अशा तक्रारी येत होत्या. आता हा त्रास संपला आहे.
नवे नियम काय आहेत?
- १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी होणाऱ्या नव्या फास्टॅगसाठी कार, जीप आणि व्हॅनसाठी KYV प्रक्रिया पूर्णपणे बंद.
- विद्यमान फास्टॅगधारकांसाठीही नियमित KYV आवश्यक राहणार नाही. फक्त तक्रारी आल्यास (जसे की लूज फास्टॅग, चुकीची वाहन श्रेणी किंवा गैरवापर) KYV करावे लागेल.
- फास्टॅग सक्रिय होण्यापूर्वीच बँकांना वाहनाची पूर्ण माहिती ‘वाहन’ डेटाबेसद्वारे पडताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. डेटाबेसमध्ये माहिती नसल्यास RC वरून पडताळणी होईल, पण त्याची पूर्ण जबाबदारी बँकेची राहील.
- ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी केलेल्या फास्टॅगवरही हेच नियम लागू.


























































