
‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता आणि प्रसिद्ध अभिनेता जय दुधाणेबाबात एक वादग्रस्त बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच जय हा विवाहबंधनात अडकलेला होता. त्यामुळे सध्या प्रकाशझोतात असतानाच जयला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. जय शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे दुकानविक्री
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जय दुधाने याने बनावट कागदपत्रे तयार करून एकाच दुकानाची अनेक ग्राहकांना विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे अनेक खरेदीदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. फसवणुकीचा हा आकडा 5 कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात जयला ताब्यात घेण्यात आले आहे.
View this post on Instagram
कुटुंबीयांचीही होणार चौकशी
या प्रकरणाचा तपास केवळ जयपुरताच मर्यादित नसून, पोलिस आता त्याच्या कुटुंबियांकडूनही या प्रकरणाची माहिती घेणार आहेत. पोलिसांकडून नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR) जयच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. यामध्ये त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि बहिणीची नावे समोर आली असून, पोलीस आता या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणी आहे का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
24 डिसेंबर 2025 रोजी जयने गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत लग्न केले होते. ठाण्यातच हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. जय दुधाणे हा प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर, खेळाडू, मॉडेल आणि अभिनेता असून एक जिम व्यावसायिक देखील आहे. दरम्यान जयवर झालेल्या या आरोपांमुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

























































