बिहार विधानसभेत राडा; विरोधक, मार्शल्समध्ये धक्काबुक्की

बिहार विधानसभेचा दुसरा दिवसही मतदारयाद्यांची फेरतपासणी आणि राज्यात गुन्हेगारी वाढल्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे गाजला. विरोधकांनी सभागृहात अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत उभे राहून जोरदार निदर्शने केली, पत्रकारांच्या टेबलसमोर ठेवलेल्या खुर्च्या उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्शल्सनी त्यांना अडवल्याने विरोधक आणि त्यांच्यात झटापट तसेच धक्काबुक्की झाली. सर्व विरोधकांनी काळे कपडे परिधान करून सभागृहात प्रवेश केला आणि सरकारचा निषेध नोंदवत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

फलक झळकवले, पायऱ्यांवर उभे राहून निदर्शने

विरोधकांकडून सभागृहाच्या मध्यभागी फलक झळकवण्यात आले. त्याला आक्षेप घेण्यात आला. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीविरोधात निदर्शने केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेकांनी संसदेच्या मकरद्वाराजवळील पायऱयांवर उभे राहून निदर्शने केली आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली.