Bihar Election 2025- प्रशांत किशोर यांनी फुंकले रणशिंग; पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर तो माझा पराभव, मात्र…

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता बिहारमधील प्रत्येक पक्षातून कोणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र स्वत: प्रशांत किशोर यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकींच्या उमेदवारांच्या रिंगणात ते उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकांवर भाष्य केलं. मी निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही. पार्टी जो निर्णय घेईल तेच होईल. पक्षाच्या हितासाठी मी आतापर्यंत जे संघटनात्मक काम करत आहे तेच मी सुरू ठेवेन. जर जनसुराज पक्षाने 150 पेक्षा कमी जागा जिंकल्या तर तो माझा पराभव असेल. जर ते त्यापेक्षा जास्त जागा जिंकले तर तो बिहारच्या लोकांचा विजय असेल, असे मत यावेळी त्यांमी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जर जनसुराजचे सरकार स्थापन झाले तर, या राजकरणात एक ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल. सरकार स्थापन होताच 100 भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक नवीन कायदा लागू केला जाईल. जनसुराज सत्तेत येऊ नये अशी प्रार्थना करणाऱ्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांसाठी हा एक इशारा आहे. कारण जर जनसुराज सरकार स्थापन झाले तर त्यांचे वाईट दिवस सुरू होतील, असा इशाराही यावेळी प्रशांत किशोर यांनी दिला.

‘बिहारला एका नव्या नेतृत्वाची गरज’
दरम्यान प्रशांत किशोर यांनी यावेळी लालू प्रसाद आणि आरजेडीवरही हल्लाबोल केला. लालू परिवारावर इतके भ्रष्टाचाराचे आरोप आणि चार्जशीट्स आहेत की आता त्या बातम्या कोणी पाहतसुद्धा नाही. आणि हेच कारण आहे आता बिहारला एका नव्या नेतृत्वाचा आणि राजकारणाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत आम्हाला फक्त सत्ता मिळवायची नाहीए, तर बिहारला एक नवी दिशा द्यायची आहे. जनसुराज ही एक असा पक्ष आहे जो राजकारणात स्वच्छ प्रतिमा, जबाबदारी आणि विकासाचा दृष्टिकोन आणण्यासाठी काम करतो. आमचे उद्दिष्ट निवडणुका जिंकणे नाही तर बिहारमध्ये सुधारणा करणे आहे. जर जनतेने आम्हाला संधी दिली तर आम्ही राज्यात प्रामाणिक प्रशासनाचे एक नवीन उदाहरण स्थापित करू, असेही त्यांनी सांगितले.

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; दोन टप्प्यात होणार मतदान, १४ नोव्हेंबरला निकाल