
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी बिहारमधील मतदार यादीत फेरफार करण्यास विरोध दर्शवला आहे. याविरोधात राष्ट्रीय जनता दलाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या मधेपुरा जिह्यातील एका महिलेच्या मतदार ओळखपत्रावर थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोटो छापून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही महिला जयपालपट्टी परिसरात राहते. महिलेच्या वोटर आयडीवर थेट बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा पती चंदन कुमारने प्रसारमाध्यमाला हे कार्ड दाखवत निवडणूक आयोगाचा कारभार चव्हाटय़ावर आणला आहे. एका महिलेच्या वोटर कार्डवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावणे ही साधारण चूक नाहीये. अडीच महिन्यांपूर्वी पोस्टात आपल्या पत्नीचे नवीन मतदार कार्ड बनवले होते. नाव, पत्ता यासह सर्व माहिती व्यवस्थित भरून दिली होती. ज्या
वेळी हे मतदार कार्ड आले, त्या वेळी लिफाफ्यावर नाव, पत्ता बरोबर होते. परंतु ज्या वेळी हे कार्ड उघडले त्यात मतदार ओळखपत्रावर नाव बरोबर होते. परंतु फोटो मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा लावला होता, असे चंदन कुमारने म्हटले. या प्रकारानंतर तत्काळ ब्लॉक लेवल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हा प्रकार कोणालाही सांगू नका, असे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान ओळखपत्रामध्ये थेट मुख्यमंत्र्यांचा फोटो लावणे हे चुकीचे आहे, असे चंदन कुमार म्हणाला.
l मतदार ओळखपत्र हे कर्नाटकातून छापून येतात. जर वोटर आयडी कार्डमध्ये कोणतीही चूक असेल तर त्या संबंधित व्यक्तीने एसडीओ कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे फॉर्म 8 भरून दुरुस्तीसाठी अर्ज करावा. त्यानंतर मतदार ओळखपत्रातील चूक दुरुस्त केली जाऊ शकते, असे उप निवडणूक अधिकारी जितेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.
l निवडणूक आयोग किती पारदर्शी आणि विश्वसनीय आहे, हे या प्रकारावरून लक्षात येते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी चंदन कुमारने केली आहे.