‘चमकी’ तापाचा बिहारमध्ये कहर, बळींची संख्या 93 वर

सामना प्रतिनिधी । मुजफ्फरपूर

बिहारमध्ये ‘चमकी’ तापाने अक्षरश: कहर माजवला असून महिनाभरात या तापाने तब्बल 93 मुलांचा बळी घेतला आहे. रविवारी सकाळी मुजफ्फरपूरमध्ये या तापामुळे एका मुलाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची भरपाई जाहीर केली.

उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात जीवघेण्या तापाचा फैलाव वाढला असून आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. मुजफ्फरपूर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, श्री कृष्णा मेडिकल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल आणि केजरीवाल हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 93 मुलांचा मृत्यू झाला. बळींमध्ये दहा वर्षांखालील मुलांचे प्रमाण अधिक आहे. तापाच्या रौद्रावताराची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही गंभीर दखल घेऊन मुजफ्फरपूरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

1 जूनपासून श्री कृष्णा मेडिकल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटलमध्ये 197 मुलांना, तर केजरीवाल हॉस्पिटलमध्ये 91 मुलांना चमकी तापाची लागण झाल्याच्या संशयावरून दाखल करण्यात आले होते. यातील बहुतांश मुले ‘हायपोग्लिसेमिआ’ने त्रस्त असल्याचे आढळले.