इंजिनीअरने परस्पर विकले रेल्वे इंजिन, बिहारमध्ये भ्रष्टाचाराचा कहर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारममध्ये रेल्वेमधील भ्रष्टाचाराचे अजब प्रकरण समोर आले आहे. येथील समस्तीपूर विभागातील एका रेल्वे इंजिनीअरने चक्क शेडमधील रेल्वेचे इंजिन विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिपायाने दिलेल्या तक्रारीनंतर इंजिनीअरच्या या घोटाळय़ाचा पर्दाफाश झाला आहे. या इंजिनीअरने डीएमआयची सही, शिक्का असलेला खोटा कागद दाखवून गेल्या अनेक वर्षापासून पूर्णिया कोर्ट स्थानकामध्ये उभे असलेले रेल्वेचे जुने वाफेवर चालणारे इंजिन परस्पर विकले आहे.

14 डिसेंबरला इंजिनीअर राजीव रंजन झा हे हेल्पर सुशील यादवच्या मदतीने गॅस कटरच्या सहाय्याने जुन्या इंजिनचे काही भाग कापत होते. तेथे नियुक्त असलेल्या एम.एम.रहमान या प्रभारीने या कामासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी इंजिनीअरने खोटे पत्र दाखवून या इंजिनला भंगारात काढण्यात आले असून पुन्हा डिझेल शेडमध्ये पोहोचवायचे असल्याचे सांगितले. दुसऱया दिवशी शिपाई संगीता कामावर पोहोचल्या. त्यांनी रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या. त्यांना त्यामध्ये एक भंगार पिकअप करणारी व्हॅन आल्याचे नमूद करण्यात आल्याचे आढळले. मात्र, संगीता यांनी डिझेल कारशेडमध्ये तपास केला असता या इंजिनचे भंगार तिथे पोहोचले नव्हते. या धक्कादायक प्रकाराची माहिती संगीता यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना दिली. आरपीएफने तपास केला असता डीएमआयने इंजिन भंगारात काढण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट झाले.

फरार इंजिनीअर, पिकअपचा शोध सुरू

दरम्यान, खोटा आदेश दाखवून इंजिन कापण्याचा प्रयत्न करणारा हा इंजिनीअर फरार आहे. या इंजिनीअरसह ज्या पिकअपची नोंदणी करण्यात आली होती. तिचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर डीआरएमच्या आदेशानुसार संबंधित इंजिनीअरसह कारशेडवर तैनात असलेला हेल्पर आणि सुरक्षारक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.