पासवानांनी भाजपचे नाक दाबताच, लोकसभेच्या सहा जागा सोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांच्या वाटपात भाजपने ‘बेदखल’ केलेल्या ‘लोकजनशक्ती पार्टी’चे नेते, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी खुबीने भाजपचे नाक दाबून आपल्या कब्जातील सहा जागा कायम राखल्या आहेत.

बिहारमधील समसमान म्हणजे 20-20 जागा आपापसात वाटून घेतलेल्या भाजप आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला प्रत्येकी तीन-तीन जागांचा त्याग पासवान यांच्यासाठी करावा लागला आहे.

पासवान यांचे खासदारपुत्र चिराग पासवान यांनी गुरुवारी ‘नोटाबंदीचा जनतेला काय फायदा झाला ते भाजपने जाहीरपणे देशाला सांगावे’ असे आवाहन करून भाजपची दुखरी नस दाबली होती. तसेच जागावाटपात न्याय मिळावा नाही तर उपेंद्र कुशवाह यांच्यापाठोपाठ भाजपला दुसरा धक्का बसण्याची शक्यता सूचित केली होती. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः हालचाली करून पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसाठी सहा जागा सोडण्यात आल्याचे जाहीर केले.