
सामाजिक ऐक्य व सद्भावना वाढीस लागण्यासाठी नगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातून मोटर सायकल रॅली काढून सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली. पोलीस व जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होण्यासाठी रेझिंग डे निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालय येथून पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश सुनीलजीत पाटील, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक अर्चित चांडक, पो.नि. विकास वाघ, पो.नि. हारुन मुलानी, सहा.पो.नि. प्रविण पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.भूषण बराठे आदी उपस्थित होते.
मोटारसायकल रॅलीद्वारे शहरातील गोविंदपुरा, हातमपुरा, कोठी, रेल्वे स्टेशन, माळीवाडा, पांचपीर चावडी, भिंगारवाला चौक, कापड बाजार, दिल्लीगेट मार्गावरील गुरुद्वारा, पारशी अग्यारी, चर्च, बुध्द विहार, मंदिर, मस्जिद, जैन मंदिर या धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली. धार्मिक स्थळात सामाजिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच मोटर सायकल रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देण्यात आला. पोलीस मुख्यालयात या मोटारसायकल रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत नलिनी गायकवाड, वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.शेखर दरंदले, अॅड.शिवाजी कराळे, अॅड.सागर पादीर, अरुण खिची, रजनी ताठे, जंगम देवा, नईम सरदार आदींसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, वकील, पत्रकार, शांतता कमिटी सदस्य, पोलीस सहभागी झाले होते.



























































