विरुद्ध दिशेने येताना हटकणाऱ्या पादचाऱ्याला ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

रस्त्यात अचानक दुचाकी समोर आली म्हणून हटकले असता पादचाऱ्याला जबर मारहाण करून पसार झालेल्या दोघा तरुणांना नेहरूनगर पोलिसांनी 48 तासांत गजाआड केले. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी पादचाऱ्यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढले.

10 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संपत सोनवणे (43) हे ठक्कर बाप्पा कॉलनी येथे रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने आलेली दुचाकी त्यांच्या समोर येऊन थांबली. त्यामुळे सोनवणे यांनी दुचाकीस्वाराला हटकले. याचा राग आल्याने दुचाकीवर असलेल्या दोघा तरुणांनी सोनवणे यांना रस्त्यात आडवे पाडून जबर मारहाण केली. त्यांचे डोके रस्त्यात आपटून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. मग गंभीर जखमी सोनवणे यांना शीव रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना 16 सप्टेंबर रोजी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच   नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे, पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे, दीपक सुर्वे, एपीआय संतोष कांबळे आदींच्या पथकाने सोनवणे यांना मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू केला.

नशामुक्ती केंद्रात सापडला आरोपी

तपासादरम्यान गुह्यातील मोटारसायकल चुनाभट्टी येथे सापडली. त्यानंतर गुह्यातील एक आरोपी महेंद्र ऊर्फ राहुल बाबरीया (23) हा पनवेलच्या सुकापूर येथील ‘आशाकिरण फाऊंडेशन’ या नशामुक्ती केंद्रात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन महेंद्रला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा सहकारी अनोज बनसोडे (22) याला स्वदेशी मिल चाळ येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांनी गुह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अवघ्या 48 तासांत पोलिसांनी गुह्याचा छडा लावला.