
सुपर यॉट ताशी 32 किलोमीटरच्या वेगाने धावते. एकदा टाकी फूल केली की सहा हजार किमी प्रवास करू शकते. न्यूयॉर्क, दि. 10 (वृत्तसंस्था) – जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱया स्थानावर असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांनी सुमारे 4200 कोटींचे जहाज (सुपरयॉट) खरेदी केले आहे. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बिल गेट्स यांनी आलिशान जहाज विकत घेतले आहे.
सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स हे वेगवेगळय़ा कारणांनी चर्चेत असतात. सध्या त्यांनी खरेदी केलेल्या यॉटमुळे ते चर्चेत आले आहेत. या सुपरयॉटची किंमत 645 मिलियन डॉलर म्हणजेच हिंदुस्थानी चलनानुसार 4200 कोटी रुपये इतकी आहे. बिल गेट्स यांना यॉट्सची आवड आहे. सुट्टीत ते यॉट्स भाडय़ाने घेऊन एन्जॉय करतात. आता तर त्यांनी लिक्वीड हायड्रोजनवर चालणारी सुपरयॉट भाडय़ाने घेतली आहे. यॉटची लांबी 370 फूट असून त्यात पाच डेस्क आहेत. त्यामध्ये जिम, योगा स्टुडियो, मसाज पार्लर, कॅस्केडिक पूल आहे. चार गेस्ट रूम, दोन व्हीआयपी स्टेट रूम आणि एक पॅव्हेलियन आहे. सुपरयॉटमध्येही एक सिनेमा थिएटर आहे. 20 जण बसून सिनेमा आरामात बसू शकतात. जहाजात थंडी वाजू नये म्हणून जेल फ्युल्ड फायर बॉल्सचा वापर केला जाणार आहे.


























































