बिलियर्ड्सपटू मनोज कोठारी यांचे निधन

माजी विश्व बिलियर्ड्स चॅम्पियन मनोज कोठारी यांचे सोमवारी तामीळनाडूतील तिरुनेलवेली येथील एका रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. कोठारी कोलकाता येथे वास्तव्यास होते. 10 दिवसांपूर्वी तिरुनेलवेली येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्स्प्लाण्ट) शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती आणि तिसऱया दिवशी ते बसून संवादही साधत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्या फुप्फुसांना संसर्ग झाला आणि सोमवारी सकाळी सुमारे 7.30 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

मनोज कोठारी यांनी 1990 साली विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यांचा मुलगा सौरव कोठारी हाही माजी विश्व बिलियर्ड्स चॅम्पियन असून, त्याने 2025मध्ये हे मानाचे विजेतेपद मिळविले होते. सौरवला या खेळाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन स्वतः मनोज कोठारी यांनीच दिले होते.