राज्यात बायोडायव्हर्सीटी पार्कला चालना देणार – मुख्यमंत्री

17

सामना प्रतिनिधी । जालना

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जलसंधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यांमध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिली. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मराठवाडा व विदर्भातील वनस्पतींच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असून मृद व जलसंधारण करावयाचे असल्यास तेथील स्थानिक प्रजातीचे राज्यामध्ये शासकीय जमिनीवर जिल्हानिहाय बायोडायव्हर्सीटी पार्क निर्माण करुन जतन करावे, असे नमुद केले.

यावेळी त्यांच्यासोबत इश्वेद बायोटेकचे संजय वायाळ व आमदार नागेश पाटील आष्टीकर हे सुध्दा उपस्थित होते. राज्यमंत्री खोतकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा सुरु केला असून त्यांच्या कडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले. मराठवाड्यात, विशेषतः जालन्यामध्ये वनाचे अत्यल्प प्रमाण पाहता खोतकर यांनी २२ जून २०१९ रोजी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वृक्ष लागवड ही व्यापक चळवळ करण्यासाठी पुढाकार घेतला. या बैठकीमध्ये इश्वेद बायोटेकचे संजय वायाळ यांनी या कल्पनेला व्यापकता देण्यावर भर दिला. तेथूनच राज्यमंत्री खोतकर यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत या संकल्पने विषयी चर्चा केली. यामध्ये जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही शासनाचे पातळीवर अशा प्रस्तावाबाबत त्वरीत आदेश निर्गमित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरून पुरविण्यात येतील, याची ग्वाही दिली.

वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हानिहाय दौरे करुन राज्यामध्ये वनांची वृध्दी होण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय दौरे पूर्वीच सुरु केलेले आहेत. त्यात त्यांनी जालना जिल्ह्यास भेट दिलेली आहे. या बायोडायव्हर्सीटी पार्कच्या माध्यमातून लाखो झाडे जालना जिल्ह्यात लावली जाणार असून १००-१०० एकरवर
शासकीय जमीनीवर असे बायोडायव्हर्सीटी पार्क तयार करण्याचे नियोजित केले असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या