सोलापुरात बर्ड फ्लूची तीव्रता वाढली, मंगळवेढय़ातील मारापूर परिसर सतर्क भाग घोषित

सोलापूर जिह्यात बर्ड फ्लूची तीव्रता वाढली आहे. मंगळवेढा तालुक्यातील मारापूर गावात बर्ड फ्लूसदृश रोगाने पक्षी मरण पावल्याने हा परिसर नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे, तर गावालगतचा 10 किलोमीटर परिसर सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित केला आहे.

यापूर्वी मंगळवेढा येथील जंवलगी येथील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबडय़ांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाला असल्याची माहिती समोर आली होती. आता मंगळवेढा येथील मारापूर येथे बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे.

सोलापूर जिह्यात बर्ड फ्लूची तीव्रता वाढतच चालल्याने चिकन व्यव्वसाय आणि अंडी व्यवसायावर संक्रांत आली आहे. चिकन दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे; तसेच अंडी विक्रेतेदेखील हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी भावामध्ये चिकन आणि अंडी विक्री सुरू आहे.

एखाद्या ठिकाणी कोंबडय़ा किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्ष्यांच्या संपर्कात अन्य पक्षी किंवा प्राणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी. आजारी पक्ष्यांची वाहतूक किंवा विक्री करू नये. सतर्क क्षेत्रात जिवंत किंवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आणि उपकरणे यांची वाहतूक करू नये.

सतर्क क्षेत्रात 5 किलोमीटर परिसरात पक्ष्यांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, वाहतूक बंद राहील. सतर्क क्षेत्रातील पक्षी खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही बाजारात नेता येणार नाही. आवश्यकतेनुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या