गूढ निळाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

निळा-गहिरा रंग त्याची गुढता अधिकच वाढवतो आणि एकटेपणाची आवड त्यात भर घालते.

निलतवा पक्ष्याचा निळा-जांभळा रंग सूर्यप्रकाशात इतका तेजस्वीपणे झळाळतो की या पक्ष्याविषयी एक प्रकारचे गूढच निर्माण होते. निरीक्षणाअंती समजले की, अशा प्रकारची रंगसंगती फक्त “Structural colouring” व “Pigment based colouring” मुळेच शक्य होते. म्हणूनच या पक्ष्याला “Mystery Bird” म्हणतात. या पक्ष्याच्या पिसांवरील आतील बाजूस हवेच्या पोकळीमुळे त्यावर पडणारा प्रकाश लोलकाप्रमाणे परावर्तित होतो. याचमुळे त्याचा निळा रंग चकाकतो. अशा प्रकारे रंगाचे सौंदर्य असणारा हा एकमेव पक्षी आहे. हे सौंदर्य तो प्रकाशात असेल तरच दिसू शकते.

हे पक्षी बांगलादेश, भुतान, चीन, हिंदुस्थान, लाओस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये आढळतात. त्यांचे नैसर्गिक निवासस्थान उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय ओलसर वन्य जंगल किंवा डोंगराळ जंगलात असते.

हे पक्षी 15 ते 18 सें.मी लांबीचे असून त्यांचे वजन 19 ते 24 ग्रॅम असते. या पक्ष्यांचे डोके गोलाकार असून शेपटी लहान असते. चोच रुंद व आकाराने मोठी असते. नर पक्ष्याचा रंग गर्द निळा-जांभळा असून पोटाचा भाग नारिंगी असतो. निळा-जांभळा रंग सूर्यप्रकाशात ‘लेझर’ किरणांप्रमाणे चकाकतो. सावलीत मात्र रंगाची चकाकी नाहीशी होते. त्यांचा नारिंगी रंग वनस्पतीमधील कॅरोटिनॉईड्समुळे तयार होतो व हे पक्षी जेव्हा कात टाकतात त्यावेळी नवीन पिसांच्या निर्मितीच्या वेळी साठवलेले कॅरोटिनॉईड्स वापरले जाते. मादी ही शेवाळी तपकिरी रंगाची असून तिच्या गळ्यावर पांढऱया रंगाचा पट्टा असतो.

या पक्ष्यांचा वावर दाट झाडांमध्ये असल्यामुळे सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. हे पक्षी स्थानिक असून फक्त हिमालयातील पक्षी हिवाळ्यात कमी उंचीवर स्थलांतर करतात.

यांचे खाणे मुख्यत्वे कीटक, आळ्या, मुंग्या, फळे व वनस्पती असते.यांचा प्रजननाचा काळ एप्रिल-ऑगस्ट असतो. नर व मादी मिळून दाट झाडांमध्ये कपाच्या आकाराचे घरटे बनवितात. मादी एकावेळी 3 ते 4 अंडी घालते. उबवण्याचे काम फक्त मादी एकटी करते. पिलांचे संगोपन मात्र नर व मादी मिळून करतात.

या पक्ष्यांची शीळ ‘स्वी येह ट्री ट्री’ असून कधी कधी हलक्या आवाजात ‘चाचा’ असते. मी सत्तालमध्ये पक्षीचित्रणासाठी गेले होते तेव्हा निलतवा पक्ष्याचे दर्शन होईल अशी कल्पनाच नव्हती. तुरेवाला धीवर पक्ष्याचे चित्रण करण्यासाठी आम्ही सर्वांनी ‘चाफी’ भागात जाण्याचे ठरविले. त्याचे मनसोक्त फोटो काढल्यानंतर आमचा मार्गदर्शक एका अवघड आडवाटेला जाऊ लागला. माझे काही धाडस झाले नाही. मी आपली आजूबाजूलाच पक्षी शोधत होते. तेवढय़ात माझ्या डोळ्यांसमोरून एक नारिंगी निळ्या रंगाचा पक्षी उडत गेला. तो उन्हामध्ये इतका चमकत होता, एखाद्या लेझर प्रकाशाच्या झोतासारखाच भासला. मी अगदी डोळे विस्फारून पाहतच राहिले. निसर्ग इवल्याशा पक्ष्यामध्ये इतके सौंदर्य निर्माण कसे करू शकतो! मी अगदी भारावून गेले. त्या पक्ष्याला जरा स्थिरावू दिले व नंतर फोटो काढले. बाकी मित्रमंडळी परत आली आणि त्यांना हवा असलेला पक्षी इकडे जवळच पाहून चकित झाली. त्या पक्ष्यावर सूर्यकिरणे ज्याप्रमाणे पडत होती त्याप्रमाणे त्याचे रंग बदलत होते. कधी चमकणारा निळा-जांभळा तर कधी गडद निळा-काळा, पोटाच्या बाजूला मात्र नारिंगी रंगाच्या छटा होत्या.

काही पक्ष्यांचे सौंदर्य हे डोळ्यांनीच बघावे लागते, कितीही प्रगत कॅमेरा असला तरीही त्या पक्ष्याची जादू फोटोत उतरत नाही. मी या पक्ष्याचे खूप फोटो काढले पण मला या पक्ष्याला सांगावेसे वाटते —

जो बात तुझ मे है, तेरी तस्वीर मे नही…