कोपरगावात बियाणे खाल्ले; विषबाधेमुळे तीन लांडोर, एक मोर मृत्यूमुखी

सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून लष्करी आळीचा हल्ला होत आहे. यामुळे शेतकरी बियाण्यांना कीटकनाशके लावून लागवड करत आहेत. मात्र, हेच बियाणे खाल्ल्याने कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे तीन लांडोर व एका मोराला आपला प्राण गमवावा लागला आहे.दोन जखमी मोरावर उपचार सुरु आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव वैजापूर रस्त्यावरील पढेगाव येथील प्रगतशील शेतकरी सतीश नेने नेहमीप्रमाणे दररोज सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी जातात, त्यांच्या शेतात भरपूर मोर आहेत. त्यांना खायला ते घेऊन जातात, आज फेरफटका मारत असताना त्यांना गट नंबर 155 मध्ये एक मोर व एक लांडोर मृत्यूमुखी पडलेले दिसले. त्यांच्याच बाजूला दोन मोर विव्हळत असल्याचे दिसून आले. ज्यांनी ते जखमी मोर घरी आणले व त्यांच्यावर औषधोपचार केले. त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. काही वेळानंतर वनरक्षक अमोल किनकर व साथीदार तेथे आले. त्यांनी जखमी मोरांवर प्राथमिक उपचार केले.

पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे म्हणाले सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतात शेतकरी बियाणे पेरतो, हे बियाणे विषारी औषधे लावलेले असल्याने हे पक्षी खातात. त्यामुळे त्यांना यापासून धोका असते. लांडोर व मोराचा मृत्यू बियाण्यावर विषारी औषध लावले असल्याने आणि ते त्यांच्या खाण्यात आल्याने झाल्याची शक्यता आहे. मोराचा आणि लांडोरांचा मृत्यु नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यावर समजेल, असे डॉक्टरांनी सांगितले.