
सामना प्रतिनिधी । वसई
इस्त्रीचे चटके देत कैची व धारदार शस्त्रांनी वार करून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. रुपाली चव्हाण असे या महिलेचे नाव असून सोबत राहत असलेल्या पेइंग गेस्टनेच दोन दिवसांपूर्वी तिचा काटा काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने नालासोपारा परिसर हादरून गेला आहे.
रुपाली चव्हाण या नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे येथे साईलिला अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहायच्या. भाजपच्या वसई-विरार जिल्हा युवती सहप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या रुपाली यांनी पती डॉ. अविनाश पवार यांना चार वर्षांपूर्वी घटस्फोट दिल्यानंतर त्या नालासोपाऱ्यात आपला मुलगा शिवम (12) याच्याबरोबर राहत होत्या. दोन दिवसांपासून मुलीचा संपर्क होत नसल्याने रुपाली यांचे वडील दिलीप चव्हाण हे मंगळवारी सकाळी साईलिला अपार्टमेंटमध्ये गेले. मात्र अनेकदा बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांनी डोकावून पाहिले असता रुपालीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या प्रकाराने धक्का बसलेल्या चव्हाण यांनी पोलिसांना माहिती दिली.
रक्ताने माखलेल्या हातानेच ‘तो’ पळाला
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यावरून ही हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रुपालीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या नितीन नावाच्या तरुणाला सोसायटीतील रहिवाशांनी रविवारी बाहेर पळताना पाहिले होते. त्याचे हातही रक्ताने माखलेले व जखम झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे या हत्येमागे नितीनचा हात असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.























































