भाजपने मिंधेंवर फोडला घोटाळ्याचा बॉम्ब; रेकॉर्डब्रेक पैसा कोण खातंय? कमळीचा अधिकाऱ्यावर रोख, शिंदेंवर निशाणा

मिंधेंच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून कमळीनेच त्याविरोधात बॉम्ब फोडला आहे. ‘मुंबई पालिकेतील एका अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडले असून या अधिकाऱयाला आवर घाला, नाहीतर सरकार कोसळेल,’ असा इशारा भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असून भाजपचा रोख अधिकाऱयावर आणि निशाणा शिंदेंवर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मेहरनजर असलेला रेकॉर्डब्रेक पैसा खाणारा पालिकेतील हा अधिकारी कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर आयुक्त-प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेचा कारभार हाकला जात आहे. मात्र ‘गद्दारी’च्या माध्यमातून सत्तेत आलेल्या ‘मिंधे’ सरकारने गेल्या अडीच वर्षांपासून स्वायत्त संस्था असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार अक्षरशः आपल्याच हाती घेतला आहे. सर्वच निर्णयांत मिंधे सरकारची ढवळाढवळ दिसून येते. रस्ते, नालेसफाईसह मुंबईतील विविध विकासकामांत पैसा ओरबाडला जात आहे. पालिकेच्या महत्त्वाच्या विभागांत भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. मिंधे आपल्या पंत्राटदार मित्रांसाठी नियम वाकवत आहेत. याविरोधात शिवसेना आणि काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला असतानाच आता भाजपनेच मिंध्यांवर बॉम्ब टाकला आहे. भाजपचे नेते मोहित पंबोज आणि आमदार प्रसाद लाड यांनी पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सारे रेकॉर्ड तोडल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे.

भाजप-शिंदे मुंबईला लुटताहेत -वर्षा गायकवाड
मुंबई पालिका सध्या कोण चालवतेय हे जगजाहीर असून भाजप आणि शिंदे मिळून मुंबईला लुटत आहेत, असा हल्ला यावरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी चढवला. निवडणूक आयोगाने दोन वेळा रिमायंडर पाठवल्यानंतर सरकारने आधीच्या आयुक्तांची बदली केली. ‘ईडी’कडून आरोप करण्यात आलेल्या त्या आयुक्तांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट करण्याचे काम केले; मात्र निवडणूक पाठी लागल्यानंतर आयोगाच्या आदेशानंतर त्यांना बदलण्याची नामुष्की आली, असेही गायकवाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनीच ‘त्या’ अधिकाऱ्याला तिथे बसवलेय!
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने बसलेला अधिकारी स्वतःला पालिकेचा सर्वेसर्वा समजतो. सर्वसामान्य नागरिकच काय, तर वैधानिक पद असलेल्या लोकप्रतिनिधींनाही योग्य वागणूक देत नाही. त्यामुळे अनेकांच्या तक्रारीही आल्या आहेत. अशा अधिकाऱयाला पदावरून तातडीने हटवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेता, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

‘त्या’ अधिकाऱयांचा गळा घोटा!
काही ठिकाणी अधिकारी सरकारपेक्षा मोठे समजून काम करायला लागतात तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हाच त्यांचा गळा घोटला पाहिजे, या मानसिकतेमधून आम्ही काम करतो. ज्या अधिकाऱयाबद्दल आता वाद निर्माण झाला आहे त्याबाबत मी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी चहल यांच्याशी बोललो आहे. याबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे. पेंद्रातून आठ महिने प्रतिनियुक्तीवर आल्यानंतर प्रतिनियुक्ती संपल्यानंतरही सातत्याने इथे थांबून मुख्यमंत्री आपल्या खिशात असल्याचे दाखवणाऱया संबंधित अधिकाऱयाला जागा दाखवण्याचे काम मी केलेय, असे भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.

या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा संशय
‘या’ अधिकाऱयाने घनकचरा विभागांतर्गत झोपडपट्टय़ांच्या स्वच्छतेचे गोरगरीबांच्या संस्थांकडून होणारे काम पंत्राटदाराकडून करण्यासाठी राबवली निविदा प्रक्रिया.

प्रमुख रुग्णालयात डीन सर्वेसर्वा असताना डीनवर ‘नजर’ ठेवण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात एका ‘एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर’ची नियुक्ती. यामुळे डीनवर दबाव येत असल्याचे बोलले जातेय.

रुग्णालयांची पंत्राटे आणि कारभारात हस्तक्षेप करण्यासाठीच ही नेमणूक केल्याची चर्चा. आपल्या माणसासाठी केईएम रुग्णालयात डेप्युटी डीनचे कार्यालय बळकावण्याचा प्रयत्नही केला.

प्रमुख रुग्णालयांचे डॉक्टर आणि परिसरातील मेडिकलच्या संगनमताने गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी दबाव आणला जातो. याबाबत वारंवार आवाज उठवूनही कारवाई नाही.

…तर सरकार कोसळेल
मुंबई महापालिकेतील एक ‘एएमसी’ भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडत आहे.

या अधिकाऱयामुळे तुमचे सरकार अडचणीत येईल. त्याला तत्काळ आवर घाला.

या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला आहे. ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार.

‘त्या’ अधिकाऱयाचे नाव पुराव्यासह उघड करणार, अशी पोस्ट मोहित पंबोज यांनी केली. दरम्यान, पंबोज यांनी नंतर ‘एक्स’वरून आपली पोस्ट हटवली.