
सामना ऑनलाईन, उज्जैन
मध्य प्रदेशातील रस्ते गुळगुळीत असल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या भाजपची एका व्हिडीओमुळे जाम पंचाईत झाली आहे. इथे होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी तयार केलेला रथ खड्ड्यात अडकल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमुळे भाजपच्या दाव्याच्या चिंधड्या तर उडाल्या आहेच शिवाय काँग्रेसलाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.
स्वर्णिम मध्य प्रदेश की अमेरिका से भी बेहतर सड़कों पर गड्ढों में फसे शिवराज सिंह जी के १४ साल के विकास को धक्का लगाते मप्र के नागरिक। pic.twitter.com/X2NFlX5AxR
— Jyotiraditya Scindia (@JM_Scindia) August 27, 2018
काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा व्हिडीओ ट्विटरद्वारे शेअर केला आहे. मध्य प्रदेशात नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये जबरदस्त प्रचार युद्ध सुरू झालं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा जास्त चांगले असल्याचं विधान केलं होतं. या विधानाचा आधार घेत शिंदे यांनी मार्मिक टीप्पणी केली आहे, ज्यात ते म्हणालेत की ‘ अमेरिकेपेक्षा उत्तम रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात अडकलेल्या १४ वर्षांच्या विकासला धक्का मारताना मध्य प्रदेशचे रहिवासी’
मध्य प्रदेशात सलग तीन टर्म भाजपचे सरकार आहे. दिग्विजय सिंह हे तिथले मुख्यमंत्री असून ते भाजपलाच पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा दावा करीत आहेत. दुसरीकडे काँग्रेसला वाटतंय की की १५ वर्ष सत्तेत असल्याने तिथल्या भाजपच्या सरकारविरोधात आता मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. याचा फायदा आपल्याला होईल आणि भाजपची सत्ता जाऊन मध्य प्रदेशात आपली सत्ता येईल असं काँग्रेसचे नेते म्हणत आहेत.























































