बेळगावात भाजपचा निसटता विजय, मराठी भाषिक उमेदवार शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार मते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp

भाजपचे दिवंगत केंद्रीयमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत सुरेश अंगडी यांच्या पत्नी व भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा अखेरच्या टप्प्यात निसटता विजय झाला. शेवटपर्यंत चुरस राहिलेल्या या निकालात काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा 2 हजार 903 मतांच्या फरकाने पराभव झाला.

मंगला अंगडी यांना एकूण 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली, तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली. सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी तब्बल 1 लाख 24 हजार 642 मते घेत सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा एकीचा विश्वास निर्माण केला आहे.

मंगला अंगडी यांना माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात 26 हजार 826, बेळगाव दक्षिणमध्ये 22 हजार 857 मतांची मिळालेली आघाडी सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. गेल्या लोकसभेपेक्षा या निवडणुकीत भाजपच्या मतात घट झाली आहे. अरभावी मध्ये 15 हजार 743, बेळगाव उत्तरमध्ये 12 हजार 759 आणि सौन्दत्तीमध्ये 16 हजार 559 मतांची आघाडी मिळवत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी शेवटपर्यंत जोरदार टक्कर दिली. बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील आर.पी.डी. कॉलेज येथे आज मतमोजणी झाली.

मराठी भाषिकांची ताकद वाढली

दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांविरोधात केवळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांच्या शुभम शेळके या उमेदवाराने लढत दिली. निवडणुकीत सिंह हे चिन्ह मिळालेल्या शुभम शेळके यांनी प्रचारातून साम, दाम, दंड, भेद विरोधात डरकाळीच फोडली होती.

तब्बल सव्वा लाख मते घेऊन शुभमने दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना घाम तर फोडलाच, शिवाय पुन्हा एकदा सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये विश्वास निर्माण केला. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱया दक्षिण बेळगावमध्ये 44 हजार 950, बेळगाव उत्तरमध्ये 24 हजार 594, तर बेळगाव ग्रामीणमधून 45 हजार 536 मते शुभम शेळके यांना मिळाली.