
सामना प्रतिनिधी। परभणी
महाराष्ट्रात आणि देशात भाजपाचे सरकार येऊन चार वर्ष उलटली. पण भाजपने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. भाजप सरकारकडून धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे, असा आरोप पत्रकार परिषदेतील धनगर समाजातील स्थानिक पातळीवरील नेते विष्णू सायगुंडे यांनी केला आहे.
२०१४ च्या निवडणुकापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जर महाराष्ट्रात व देशात भाजपाचे सरकार आले तर धनगर समाजाला महाराष्ट्राच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावनी करु,’ असे आश्वासन दिले होते. पण गेल्या ७० वर्षांपासून देशात आणि राज्यात दोन्ही काँग्रेस आणि आता भाजपाचे सरकार यांनी केवळ धनगर समाजाचा केवळ मतासाठी वापर केला. आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही, असा आरोप सायगुंडे यांनी केला. गेल्या ७० वर्षापासून आरक्षणापासून धनगरसमाजाला वंचित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे धनगरसमाज आता जागरुक झाला असून कोणत्याही पक्षाच्या भूलथांपांना बळी न पडता, तिसरा पर्याय सक्षमपणे धनगर समाज निर्माण करणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात धनगर समाज मागेच आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधीत्व मिळाले नाही. एकजुटीने आरक्षणासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे न्यायालय प्रक्रीया चालू असताना भाजप सरकारने ९६२ पानांचा अहवाल तयार केला. या अहवालात धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये येत नाही. त्यामुळे सवलती देता येत नाहीत. धनगरसमाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करु नये, असा अहवाल सादर करण्यात आला. एकीकडे भाजप सरकार धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावनी करु, असे सांगते आणि दुसरीकडे आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न करते, अशा दुटप्पी भूमिकेमुळे धनगर समाज नाराज झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाज नेत्यांच्या हातामध्ये न देता, आता मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणार असल्याचे विष्णू सायगुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापुढे धनगर समाज स्वत:च्या अरक्षणाची चळवळ स्वबळावर उभारणार असून धनगर समाज आरक्षण मागणीसाठी १६ ऑगस्ट पासून तुळजापूर ते चौंढी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी सायगुंडे यांनी दिली.
summary…bjp cheat dhangar community




























































