राज्यात बालिका, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार तसेच बदलापूर प्रकरणावरून नागरिकांमध्ये आजही संताप आहे. तरीही भाजपच्या नगरसेवकाने कोचिंग क्लासवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी नगरसेवकाला अटक केली असून, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हितेश रामकृष्ण कुंभार (रा. मनकर सोसायटी, अकोले, ता. अकोले, जि. नगर) असे अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी नगरसेवक कुंभार हा गेल्या पंधरा दिवसांपासून सदर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. कोचिंग क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्याकडे एकटक बघून बोलण्याचा प्रयत्न करीत असे. तसेच घरी जात असताना तिचा पाठलाग करायचा. दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलगी क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपी कुंभार याने तिचा हात पकडून जवळ ओढले व ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून तिच्या अंगावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. त्यानंतर सदर मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर मंगळवारी (दि. 3) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सदर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.
खंडणीप्रकरणी तुरुंगवास
आपण भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगत याच हितेश कुंभारने 23 डिसेंबर 2023 रोजी कल्याणमधील (मुंबई) कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लैला डान्सबार चालकाकडे खंडणी मागितली होती. त्याबाबत कोनगाव ठाण्यात नगरसेवक कुंभार याच्यासह दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुह्यात हितेश कुंभार तुरुंगात होता. अनेक दिवसांनंतर न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. हा गुन्हा दाखल असतानाच आता त्याच्यावर अकोले ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.