भाजपला शिंदे शिवसेना नकोय – उद्योगमंत्री उदय सामंत

भाजपसोबत युती करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, त्यांनी गाफील ठेवत युती केली नाही. शिंदे शिवसेनेच्या विश्वासघाताची आणि भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधातील ही निवडणूक आहे. शिंदेसेनेचे बरचेसे काम उपमुख्यमंत्री अजित पवार हलके करत आहेत. त्यामुळे पवार जे म्हणतील त्याला ‘मम्’ म्हणायचे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. शिंदेसेना भाजपसोबत असता, तर काही लोकांची ढाल बनलो असतो. पण, त्यांना शिवसेना नकोच आहे. त्यामुळे लाचारी करायची देखील काही गरज नव्हती, असेही सामंत म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील शिंदे सेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी वाकड येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. शेवटच्या तीन दिवसात दबाव, दादागिरीचे राजकारण केले जाऊ शकते. या सगळ्या गोष्टीसमोर छातीठोकपणे उभे रहावे. शिंदे सेनेच्या उमेदवारांनी कोणालाही घाबरु नये’, असे आवाहनही त्यांनी केले.