
पुण्यामध्ये भाजपसह विविध पक्षांकडून तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी इतर पक्षांची वाट धरल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसांत भाजपच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
पुण्यात भाजपकडे सर्वाधिक इच्छुक असल्याने अनेकांना तिकीट मिळाले नाही, तर उमेदवारी निश्चित झालेल्यांना थेट फोन करून एबी फॉर्मही पोहोचवण्यात आले. मात्र याच प्रक्रियेत अनेक ज्येष्ठ व माजी नगरसेवकांना डावलण्यात आल्याने नाराजी उफाळून आली आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी कमळ बाजूला ठेवत इतर पक्षांत प्रवेश केला आहे.
रविवारी वडगाव शेरी भागातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप जराड, माजी नगरसेवक नारायण गलांडे, नगरसेविका सुनीता गलांडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर सोमवारी भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. नीलेश निकम, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि मनसेचे जयराज लांडगे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.





























































