
पुणे महापालिकेत ‘प्रशासकराज ‘मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून गुंडाशाही सुरू झाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता भाजपचा पदाधिकारी ठपवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश करत आहेत. या पदाधिकाऱ्याकडून मोठा जमाव घेऊन अचानक हे आंदोलनकर्ते मोठमोठ्याने घोषणाबाजी करणे, इमारतीमध्ये बैठे आंदोलन करून रस्ता अडवणे, प्रशासकीय कामात अडथळा आणणे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला समज देण्याची मागणी महापालिकेच्या सुरक्षा विभागाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे केली आहे.
महापालिकेत किंवा महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नागरिक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटनांकडून आंदोलन केले जात असते. याप्रकराचे आंदोलन करण्यापूर्वी पोलीस परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच या आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ हे संबंधित खातेप्रमुख आदी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येते. या शिष्टमंडळात कोणाचा सहभाग आहे, याप्रकारची कल्पना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तास असलेले पोलीस, महापालिकेच्या सुरक्षारक्षक विभागाला देणे आवश्यक आहे. या शिष्टमंडळाची भेट संबंधित अधिकाऱ्यांशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर पाठविण्यापर्यंत सुरक्षा विभागाचे कर्मचारी तैनात असतात.
भाजपच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेत आंदोलन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे पदाधिकारी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात अचानक कोणतीही पूर्वसूचना पोलीस स्टेशन अथवा सुरक्षा विभागाला न देता जमावाला सोबत घेऊन पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये येतात. त्यांच्यासोबत किमान ३० ते ३५ महिला व तरुण कार्यकर्ते सहभागी असतात. त्यामध्ये काही तरुण कार्यकर्ते हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्याकडून पालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण किंवा नुकसान होऊ शकते. या समूहामध्ये त्यांच्यासोबत असणारे काही कार्यकर्त्यांपैकी सुरक्षा विभागाकडील व घनकचरा विभागाकडील कंत्राटी कामगारांचा समावेश असतो.
कामगारांच्या आंदोलनाला जास्त कार्यकर्ते आणतो म्हणून कारवाई नाही
भाजप पदाधिकाऱ्याच्या गुंडाशाहीबाबत भाजपच्या नेत्यांकडेही पालिका अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. संबंधितांना समज देण्याची मागणी केली. मात्र, माझ्या आंदोलनांमध्ये हा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन येत असतो. त्यामुळे त्याला कसे समजवणार, असे सांगत भाजप नेतेदेखील हतबल असल्याचे अधिकारी-कर्मचारी सांगतात.
प्रश्नांसाठी विविध खातेप्रमुखांना भेटायला येताना त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते मोठमोठ्या घोषणा देतात. घोषणाबाजीमुळे प्रशासकीय कामात अडथळा निर्माण होत असतो. त्यांना व त्याच्या सोबत आलेल्या तरुणांना घोषणा देऊ नका, असे सांगितले असता, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. पुन्हा घोषणा देऊन पालिकेत गोंधळाचे वातावरण निर्माण करतात. त्यांच्या या आंदोलन आणि घोषणाबाजीचे सुरक्षारक्षकांकडून चित्रीकरण केले असता, भाजप कार्यकर्ते सुरक्षारक्षकांना अरेरावी करत हुज्जत घालून चित्रीकरण करण्यापासून रोखतात. त्यांच्या अशा या वर्तनामुळे सुरक्षा विभागाच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम होत आहे. तसेच आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अंशदायी योजना कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचे थेट न विचारता चित्रीकरण करणे, मोठ्या आवाजात घोषणा देणे, धुडगूस घालणे आणि जाण्या-येण्याच्या रस्त्यात बैठक मांडून रस्ता अडविण्याचे कृत्य भाजप पदाधिकाऱ्यांकडून घडलेले आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी सुरक्षा विभागाने पोलिसांकडे केली आहे.