
नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात देशभरात सुरू असलेली आंदोलने आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळल्यानंतर केंद्र सरकार आणि भाजपला आता जाग येऊ लागली आहे. नागरिकत्व कायदा अंगलट आला अशी उपरती भाजपला होऊ लागली असून, भाजपचे मंत्री जाहीरपणे कबुली देऊ लागले आहेत.
नागरिकत्व कायद्याविरोधात ईशान्य हिंदुस्थानसह अनेक राज्यांमध्ये तीव्र आंदोलने सुरू आहेत. भाजपशासित उत्तरप्रदेशात तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात दोघांचा बळी गेला आहे. जनतेचा वाढता विरोध पाहून आता भाजप आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार बॅकफूटवर जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
मंत्री संजीव बालियान काय म्हणाले…
भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांनी ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेकडे नागरिकत्व सुधारित कायदा अंगलट आल्याचीच कबुली दिली आहे. या कायद्याला देशभरात एवढा मोठा विरोध होईल असा विचार भाजपच्या इतर खासदारांनीही केला नव्हता. हे विधेयक मंजूर करताना ज्या राजकीय गणिताचा विचार करायला पाहिजे होता तो केला गेलेला नाही हेच आता दिसते, असे स्पष्टपणे बालियान यांनी म्हटले आहे.
खुद्द पंतप्रधान मोदींनाही अंदाज नव्हता
नागरिकत्व कायद्याला एवढा मोठा विरोध होईल याचा अंदाज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनाही नव्हता. त्यामुळे रविवारी रामलीला मैदानावर झालेल्या सभेत पंतप्रधानांनी ‘एनआरसी’ लागू करणार नाही. डिटेंशन कॅम्प सुरू केले नाहीत असा खुलासा त्यांना करावा लागला. याकडेही ‘रॉयटर्स’च्या वृत्तात लक्ष वेधले आहे.
आता भाजप डॅमेज कंट्रोल मोडमध्ये
आणखी एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने ‘रॉयटर्स’ला सांगितले की, आता आम्ही डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आहोत. नागरिकत्व कायद्याला भाजपच्या एनडीएतील मित्रपक्षांचाही विरोध आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे भाजपकडून मित्रपक्षांना बरोबर घेऊन एक अभियान चालविण्याचा विचार आहे. नागरिकत्व कायदा भेदभाव करणारा नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.


























































